पोलिसांच्या शौर्याला राज्य सरकारचा सलाम; ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ जाहीर
मुंबई : कर्तव्य बजावताना जीवाची पर्वा न करता जोखीम पत्करून साहसी कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पोलिसांच्या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीला राज्यस्तरावर गौरव मिळणार आहे.
शौर्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री शौर्य पदकासह प्रशस्तीपत्र आणि रोख ५० हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. पदकासाठी पात्र व्यक्तींची निवड करण्यासाठी त्रिस्तरीय विविध समित्यांची रचना करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी वर्षभरातील उल्लेखनीय कामगिरीचा विचार केला जाणार असून, यावर्षी १ जानेवारी २०२६ पासून केलेल्या शौर्यपूर्ण कामगिरीचा विचार करण्यात येणार आहे. दरवर्षी १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री शौर्य पदकांची घोषणा करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पदकांचे वितरण करण्यात येणार असून, या योजनेमुळे पोलिसांच्या धाडसी कार्याला प्रोत्साहन मिळणार आहे. या निर्णयाला गृह विभागाने मंजुरी दिली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





