संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ३०२ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
वडोदतांगडा येथे भव्य रक्तदान शिबिर; मानवकल्याणासाठी सेवाभावातून रक्तदान
पारध : प्रतिनिधी/ महेंद्र बेराड:-
संत निरंकारी मिशनच्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन (दिल्ली), शाखा पारध यांच्या वतीने शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी वडोदतांगडा, ता. भोकरदन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल ३०२ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवकल्याणाच्या कार्यात मोलाचे योगदान दिले.
शिबिराचे उद्घाटन आ. सचिनजी आधाने (झोनल इन्चार्ज, छत्रपती संभाजीनगर), आ. राजकुमारजी परसवाणी (ब्रह्मज्ञान प्रचारक व संयोजक, जालना), आ. संपतजी काटोले (मुखी, पारध), आ. कैलासजी धोंडकर (मुखी, शिवना), आ. विष्णूजी जाधव (संचालक, अंबड), डॉ. सी. आर. तांदुळजे, श्री. नारायणशेठ तांगडे, श्री. नाना पाटील तांगडे, श्री. वर्धमानशेठ, श्री. सोनुने (ग्रामविस्तार अधिकारी), श्री. पळस्कर सर (केंद्रप्रमुख), श्री. सय्यद सर (मुख्याध्यापक) आणि श्री. आशिष पाटील सर (सहशिक्षक) यांच्या उपस्थितीत व हस्ते करण्यात आले.
संत निरंकारी मंडळाच्या युनिट क्रमांक १६६५चे संचालक महात्मा बाबुरावजी काकफळे, संचालिका बहनजी आ. छायाताई तांगडे तसेच सेवादलातील महात्मे व बहिणजी यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. शिबिरातील नियोजन, रक्तदात्यांची नोंदणी, व्यवस्था आणि सेवा कार्यात स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
रक्तसंकलनाचे कार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथील रक्तपेढीच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने केले. वैद्यकीय पथकाने रक्तदात्यांची आवश्यक तपासणी करून सुरक्षित पद्धतीने रक्तसंकलन केले.
रक्तदान हे केवळ सामाजिक दायित्व नसून गरजू रुग्णांचे प्राण वाचविणारे मानवसेवेचे श्रेष्ठ कार्य आहे. या भावनेतून ३०२ रक्तदात्यांनी केलेले स्वेच्छा रक्तदान हे समाजासाठी प्रेरणादायी ठरले. संत निरंकारी मिशनच्या सेवाभावी उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.




