पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीसाठी प्रशासनाचे कडक निर्बंध


पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीसाठी प्रशासनाचे कडक निर्बंध

वाहन धुणे, स्विमिंग पूल व बांधकामासाठी पाण्याच्या वापरावर निर्बंध; अनधिकृत पाणी उपशावर कारवाईचा इशारा

जालना : प्रतिनिधी महेंद्र बेराड

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजलपातळीत मोठी घट झाली असून, ग्रामीण तसेच नागरी भागातील पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. उपलब्ध पाणीसाठा प्रामुख्याने पिण्यासाठी सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने पाणी बचतीसाठी विविध कडक उपाययोजना लागू केल्या आहेत. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी नागरिकांसाठी मार्गदर्शक नियमावली जाहीर करून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.

वाहन धुणे, रस्ते व अंगणात पाणी मारण्यास बंदी

पाणीटंचाईच्या कालावधीत शहरी भागात घरगुती नळाचे किंवा बोअरवेलचे पाणी वापरून वाहने धुण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच रस्ते व अंगण स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा अनावश्यक वापर करण्यासही निर्बंध आहेत. वाहनांची स्वच्छता करण्यासाठी शक्यतो ओल्या कापडाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

स्विमिंग पूल व बांधकामासाठी पाणी वापरावर निर्बंध

व्यावसायिक तसेच खासगी स्विमिंग पूल तात्काळ बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवीन बांधकामांसाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर पूर्णपणे थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नळ गळती अथवा पाण्याचा अपव्यय करणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

अनधिकृत पाणी उपशावर प्रशासनाची नजर

ग्रामीण भागात धरणे, कालवे, नद्या व तलावांमधून पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल व जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांकडून गस्त घालण्यात येणार आहे. टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा वापर केवळ पिण्यासाठी व घरगुती कारणांसाठी करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करावा

शेतीसाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा अधिकाधिक वापर करावा तसेच उपलब्ध पाण्याचे नियोजन करूनच पिकांची निवड करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नवीन विहीर, बोअरवेल खोदण्यावर निर्बंध

महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ अंतर्गतही विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक जलस्रोतांपासून ५०० मीटर परिसरात पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी नवीन विहीर किंवा बोअरवेल खोदण्यास बंदी आहे. तसेच ६० मीटर अर्थात २०० फुटांपेक्षा अधिक खोलीची बोअरवेल खोदण्यावर निर्बंध असून, अनधिकृत विंधन विहीर खोदल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक

सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर विपरीत परिणाम करणाऱ्या खासगी विहिरी किंवा बोअरवेलमधून पाणी उपसा करण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. तसेच शहरी व निमशहरी भागातील १०० चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या इमारती व सोसायट्यांसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि बोअरवेल रिचार्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

‘पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा’

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा, अनावश्यक पाणी वापर टाळावा आणि प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!