वायसीएम रुग्णालयाच्या आवारात धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण खाली पडला; घटनेची चर्चा
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएम) आवारात धावत्या रुग्णवाहिकेतून एक बेवारस रुग्ण खाली पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ काही नागरिकांनी चित्रित केला असून, रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या आवारात रुग्णवाहिका जात असताना त्यातून एक रुग्ण खाली पडला. या घटनेनंतर संबंधित रुग्णाला पुन्हा वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या घटनेत रुग्णाला गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिकेतून रुग्णांची वाहतूक करताना आवश्यक सुरक्षितता उपायांचे पालन केले जाते का, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच, घटनेची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणीही केली जात आहे.
दरम्यान, रुग्णवाहिकेतून रुग्ण खाली पडण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत रुग्णालय प्रशासनाची अधिकृत भूमिका आणि चौकशीचा तपशील समोर आल्यानंतर घटनेचे अधिक स्पष्ट चित्र समोर येऊ शकेल.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी






