नृत्यशारदा कथक कलामंदिराचा ‘अर्घ्य – क्षीरसागर दिव्य मंथन’ स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
दुर्गा स्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात; 150 विद्यार्थिनींचा सहभाग, कथक नृत्याने रसिकांची मने जिंकली
पुणे : नृत्यशारदा कथक कलामंदिराच्या वतीने आयोजित ‘अर्घ्य – क्षीरसागर दिव्य मंथन’ हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम रविवारी, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता वल्लभनगर येथील आचार्य अत्रे सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात सुमारे 150 विद्यार्थिनींनी सहभाग घेत कथक नृत्यकलेचे बहारदार सादरीकरण केले.
कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थिनींनी सादर केलेल्या दुर्गा स्तुतीने कार्यक्रमाला मंगलमय सुरुवात झाली. भारतीय संस्कृती, परंपरा आणि शास्त्रीय नृत्यकलेचा संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.
या कार्यक्रमाचे सादरीकरण नृत्यशारदा कथक कलामंदिराच्या गुरु स्नेहल सोमण आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पं. मनिषाताई साठे उपस्थित होत्या. तसेच विशेष अतिथी म्हणून गुरु ज्योती शिधये आणि गुरु पायल गोखले यांनी उपस्थिती दर्शवली.
विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विविध कथक नृत्यरचनांमधून ताल, लय, भावमुद्रा आणि पदन्यास यांचा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला. पारंपरिक शास्त्रीय नृत्यशैलीतून भारतीय संस्कृती आणि अध्यात्मिक परंपरेचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न या सादरीकरणातून करण्यात आला. विद्यार्थिनींच्या मेहनतीला आणि कलात्मक सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. गुरु स्नेहल सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्याविष्कारातून कथक कलेप्रती असलेली निष्ठा, साधना आणि समर्पण दिसून आले.
भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेचा वारसा जपत नव्या पिढीमध्ये कथक कलेची आवड निर्माण करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
पत्रकार : उमेश कुलकर्णी
9822548429






