महिलांसाठी मोफत स्तनाच्या कर्करोगाची तपासणी; ‘नमो शक्ती रथा’चा शुभारंभ
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘नमो शक्ती रथा’ला हिरवा झेंडा दाखवून नागपूरसाठी रवाना केले. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्तनाच्या कर्करोगाची तपासणी मोफत करून घेता येणार आहे.
सुरुवातीला नागपूरमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांपर्यंत ही सुविधा पोहोचविण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून महिलांना मोफत, सुरक्षित आणि गोपनीय पद्धतीने स्तनाच्या कर्करोगाची तपासणी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान व्हावे आणि महिलांमध्ये या आजाराबाबत जनजागृती वाढावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. वेळेवर तपासणी आणि योग्य उपचारांमुळे आजाराचे गांभीर्य कमी करण्यास मदत होऊ शकते.
महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा असून, राज्यातील अधिकाधिक महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





