बालाजी विद्यालयाचा वैद्यकीय क्षेत्रात डंका!
सहा विद्यार्थ्यांची वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी निवड; तिघांना एमबीबीएस, तर तिघींना बीएचएमएसची संधी
वालसावंगी : प्रतिनिधी/ महेंद्र बेराड | दि. १३ ऑक्टोबर २०२६
वालसावंगी (ता. भोकरदन) येथील बालाजी विद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नीट (NEET-2026) परीक्षेनंतर झालेल्या प्रवेश प्रक्रियेत तीन विद्यार्थ्यांची एमबीबीएस, तर तीन विद्यार्थिनींची बीएचएमएस अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात भरारी घेत बालाजी विद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे यश परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथमेश समाधान तेलंग्रे याची अदानी मेडिकल कॉलेज, वर्धा येथे, आदित्य पंडितराव फुसे याची डी. वाय. पाटील महाविद्यालय, कोल्हापूर येथे, तर केदार गजानन आखाडे याची एमजीएम मेडिकल कॉलेज, छत्रपती संभाजीनगर येथे निवड झाली आहे.
तसेच बीएचएमएस अभ्यासक्रमासाठी कु .पायल किशोरकुमार फुसे हिची डी. के. एम. एम. महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे, कु .अंजली किशोरकुमार फुसे हिची डॉ. उल्हास पाटील महाविद्यालय, जळगाव येथे, तर कु.रोशनी संजय तेलंग्रे हिची वैजापूर येथील आनंद मेडिकल महाविद्यालयात बी एच एम एस कोर्स साठी निवड झाली आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीटसारख्या स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, पालकांनी दिलेले प्रोत्साहन आणि शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन या यशामागील महत्त्वाचे घटक ठरले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही उच्च शिक्षणाची क्षमता असून, योग्य मार्गदर्शन आणि परिश्रमांच्या बळावर मोठी स्वप्ने साकार करता येतात, हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांच्या गौरवासाठी आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब कोथलकर, उपाध्यक्ष डॉ. अनिलकुमार लाठे, सचिव संजयजी कोथलकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास फुसे आणि प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विशाल गुजर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कोथळकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले. संस्थेच्या शैक्षणिक कार्याला मिळणारे प्रोत्साहन, मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे योगदान आणि पालकांचे सहकार्य यामुळे विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीला बळ मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला भारत घुनावत सर, योगेश घुले, अनंत बारोटे, शरद वनारसे, पवनसिंग परदेशी, अरुण मुरडकर, प्रवीण उगले, गणेश तेलंग्रे, संभाजी राऊत, नितीन सपकाळ, डी. के. सपकाळ, निवृत्ती काळे, धनंजय साबळे, गजानन खडके, प्रशांत बारी, संतोष बोडखे, ज्ञानेश्वर सानप, इम्रान सर, रिजवान सर, पवन साखरे, सागर बावस्कर, सोनल सिनकर, विनिता सपकाळ, नेहा तापकीर, पूनम बोडखे, सुवर्णा मुळे, प्रिया डब्बे, अनिता कोठाळे, सीमा सपकाळ, अर्चना हिवाळे, वृषाली शेवाळे, गीता राजपूत, पायल मुरडकर,आरती इंगळे, आरोग्य सेविका पल्लवी मोकसरे, मनीष कोथळकर, गजानन हिवाळे, गणेश सिरसाट आणि पवन अस्वार यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बालाजी विद्यालयाच्या सहाही गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे विद्यालयासह संपूर्ण परिसराचा गौरव वाढला असून, त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. विशेष म्हणजे सहापैकी पाच विद्यार्थी हे बारी समाजातील असल्यामुळे सूर्यवंशी बारी समाजातून या विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.अखिल भारतीय बारी समाज महासंघाच्या वतीने भोकरदन तालुका उपाध्यक्ष महेंद्र बेराड यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.






