ह्युंदाईच्या तळेगाव प्रकल्पातून १८ हजार रोजगारांच्या संधी!


ह्युंदाईच्या तळेगाव प्रकल्पातून १८ हजार रोजगारांच्या संधी!

तळेगाव, पुणे : पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे ह्युंदाई मोटर इंडियाच्या वाहननिर्मिती प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पातील गुंतवणूक ७ हजार कोटींवरून ११ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचे नियोजन असून, पुरवठा साखळीतील उद्योगांमधून सुमारे १८ हजार रोजगारांच्या संधी निर्माण झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ह्युंदाईच्या भारतातील ३० वर्षांच्या प्रवासानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोगो आणि प्रकल्पाच्या उद्घाटन फलकाचे अनावरण केले.
प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता १ लाख ७० हजारांवरून ३ लाख २० हजार वाहनांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. तसेच स्थानिक लघु व मध्यम उद्योगांकडून सुट्या भागांची खरेदी वाढविण्यावर कंपनीचा भर आहे. प्रकल्पात सुमारे २५० रोबोंच्या मदतीने अत्याधुनिक वाहननिर्मिती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील उद्योगपूरक वातावरणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दक्षिण कोरियातील कंपन्यांना राज्यात अधिक गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. ‘पुण्यात डिझाइन करा, पुण्यात तयार करा आणि संपूर्ण जगाला पुरवठा करा,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला ह्युंदाई मोटर ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष यूइसुन चुंग, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके आणि दक्षिण कोरियाचे राजदूत ली सॉन्ग-हो यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


66
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!