यूके-महाराष्ट्र विकास भागीदारीला मोठी चालना


यूके-महाराष्ट्र विकास भागीदारीला मोठी चालना

यूके-महाराष्ट्र विकास भागीदारीला मोठी चालना; व्यापार आणि गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार
मुंबई : महाराष्ट्र आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडच्या युनायटेड किंगडम सरकारदरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून त्याची देवाणघेवाण करण्यात आली.
या वेळी यूकेचे व्यवसाय, नवोन्मेष, विज्ञान आणि व्यापार विषयक राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स उपस्थित होते. या करारामुळे महाराष्ट्र आणि यूके यांच्यातील आर्थिक संबंधांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन
या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य वाढविण्यासाठी शासनस्तरावर समन्वयाची प्रभावी यंत्रणा विकसित करणे हा आहे. तसेच उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील सहकार्य वाढवून दोन्ही बाजूंना उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ घेण्यावर भर देण्यात येणार आहे.
भारत आणि यूके यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक व व्यापार कराराच्या (CETA) अंमलबजावणीला चालना देणे, व्यापारातील अडथळे दूर करणे आणि वस्तू व सेवांची देवाणघेवाण अधिक सुलभ करणे, हीदेखील या उपक्रमाची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत.
निर्यातदारांना मिळणार सहकार्य
CETA अंतर्गत उपलब्ध होणारे लाभ संबंधित उद्योग आणि व्यावसायिक घटकांपर्यंत पोहोचावेत, यासाठी कराराच्या अंमलबजावणीतील अडचणी ओळखून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. व्यापार सुलभतेसाठी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देणे आणि निर्यातदारांना परदेशी बाजारपेठांमध्ये व्यवसायाच्या नव्या संधी मिळवून देणे, यावर विशेष भर असेल.
उद्योगांसाठी नव्या संधी
महाराष्ट्र आणि यूकेमधील उद्योग-व्यवसायांमध्ये परस्पर संवाद वाढविणे, बाजारपेठांमधील संधींबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गुंतवणुकीचा प्रवाह वाढविणे, ही या भागीदारीची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
या कराराच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. व्यापार आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्यास राज्याच्या आर्थिक विकासालाही चालना मिळू शकते.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


66
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!