ग्रँड टूर सायक्लोथॉन स्पर्धेच्या ११३ कोटींच्या खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करा!
भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रँड टूर सायक्लोथॉन स्पर्धेसाठी प्रस्तावित ११३ कोटी रुपयांच्या खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या स्पर्धेच्या खर्चाचे स्वरूप, निविदा प्रक्रिया आणि सार्वजनिक निधीच्या विनियोगाबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत असल्याने संपूर्ण प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करणे आवश्यक असल्याचे काळभोर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, निगडी ते पिंपरीदरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर मेट्रो रेल्वेच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. अशा परिस्थितीत मोठ्या खर्चाच्या स्पर्धेचे आयोजन करताना नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ग्रँड टूर स्पर्धेच्या कामातील कंत्राट, उपकंत्राटदारांची नियुक्ती आणि कामांच्या वाटपाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. संबंधित कंत्राटदारांकडून लोकप्रतिनिधींच्या नातेवाइकांना उपकंत्राटे दिल्याच्या आरोपांची निष्पक्ष पडताळणी करावी, तसेच कंत्राट प्रक्रियेत हितसंबंधांचा संघर्ष किंवा नियमबाह्य आर्थिक व्यवहार झाले आहेत का, याची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून खर्चाचे अंदाजपत्रक, निविदा, कार्यादेश, करारनामे, उपकंत्राटे आणि देयकांची तपासणी करावी. चौकशीत अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. तसेच निगडी ते पिंपरीदरम्यानच्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.
या तक्रारीवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल द्यावा, अशी विनंतीही त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
प्रतिनिधी विजय अडसूळ








