एआय निर्मित छायाचित्रावरून वाद; ‘सकाळ’ वृत्तपत्राकडून दिलगिरी
पिंपरी-चिंचवड : ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या पिंपरी-चिंचवड आवृत्तीत बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या एका वृत्तातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने तयार केलेल्या छायाचित्रावरून वाद निर्माण झाला. या छायाचित्रामुळे काही नागरिकांच्या आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करण्यात आली. या प्रकरणी ‘सकाळ’ वृत्तपत्राने स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली आहे.
‘पिंपरी-चिंचवड टुडे’ या पुरवणीत ‘नवरात्रोत्सवात रास-गरब्याद्वारे तरुणाईची धूम’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्तासाठी मेटा एआयच्या माध्यमातून छायाचित्र तयार करण्यात आले होते. नवरात्रोत्सवात तरुण-तरुणींचा सहभाग दर्शविणारे चित्र तयार करण्यासाठी सूचना (प्रॉम्प्ट) देण्यात आल्याचे ‘सकाळ’कडून स्पष्ट करण्यात आले.
मात्र, या छायाचित्रातील चित्रणावर काही नागरिकांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेत धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार केली. यासंदर्भात संबंधितांनी ‘सकाळ’च्या कार्यालयात लेखी निवेदनही सादर केले.
या प्रकरणी भूमिका स्पष्ट करताना ‘सकाळ’ने कोणत्याही नागरिकाच्या अथवा धर्माच्या भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता आणि नाही, असे नमूद केले. समाजातील सज्जनशक्तीने एकत्र येऊन समाजहिताचे उपक्रम राबवावेत, हीच ‘सकाळ’ची कायम भूमिका असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. तरीही, वाचकांच्या भावना लक्षात घेऊन या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
या घटनेमुळे वृत्तांकनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून छायाचित्रे तयार करताना त्यातील दृश्ये, सांस्कृतिक संदर्भ आणि धार्मिक संवेदनशीलता यांची काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
प्रतिनिधी :उमेश कुलकर्णी







