ब्राह्मण समाजातील उद्योजकांना व्यासपीठ छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ऑक्टोबरला भव्य ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्स!


छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ऑक्टोबरला भव्य ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्स!
ब्राह्मण समाजातील उद्योजकांना एकत्र आणण्याचा उपक्रम; शासकीय योजना, उद्योगवाढ आणि व्यवसायाच्या संधींवर मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगर, दि. १९ ऑक्टोबर २०२६ : ब्राह्मण समाजातील व्यावसायिक, उद्योजक, गृहउद्योग चालक आणि सेवा उद्योगाशी संबंधित व्यक्तींना एकत्र आणून उद्योग-व्यवसायाची वाढ साधणे तसेच समाजाच्या आर्थिक प्रगतीला चालना देण्याच्या उद्देशाने रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत एस.बी. कॉलेज, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर येथील पद्मश्री गोविंदभाई श्रॉफ सभागृहात ही परिषद होणार आहे. या परिषदेत विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि अनुभवी उद्योजक मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती संयोजक सचिन वाडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विविध विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने होणार आहे. महामंडलेश्वर महंत सुधीरजी दास (काळाराम मंदिराचे पुजारी) यांचे आशीर्वचन लाभणार असून, उद्योजक विवेक देशपांडे हे मार्गदर्शन करणार आहेत.
परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनांची माहिती देण्याबरोबरच इच्छुकांसाठी अर्ज भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कॅप्टन आशिषजी दामले हे स्वतः महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देणार आहेत.
अनुभवी उद्योजक राम भोगले हे शून्यातून व्यवसाय कसा उभा करावा, त्याचा विस्तार कसा करावा आणि व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींवर मात कशी करावी, याविषयी मार्गदर्शन करतील. उद्योजक विवेक देशपांडे हे ‘ब्राह्मण समाज : काल, आज आणि उद्या’ या विषयावर विचार मांडतील.
श्री बाजीराव धर्माधिकारी हे शासकीय योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीविषयी मार्गदर्शन करतील. छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजुरकर हे परशुराम भवनविषयी माहिती देऊन शुभेच्छापर मार्गदर्शन करतील. श्री राजेंद्र तोंडापुरकर हे एमएसएमई (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग), तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांविषयी आपले विचार मांडतील.
स्नेहभोजनानंतर पुरस्कार वितरण आणि सत्कार
कार्यक्रमात स्नेहभोजनानंतर ब्राह्मण समाजातील विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. गुणवंत व्यक्तींना पुरस्कार प्रदान करून मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
दुसऱ्या सत्रात उद्योग आणि व्यवसायाच्या संधींवर चर्चा
दुसऱ्या सत्रात श्री रमेश देहेडकर मार्गदर्शन करतील. आमदार अमर राजुरकर हेही उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. श्री विश्वजीत देशपांडे हे अमृत योजनेविषयी आपले विचार मांडतील.
श्री चैतन्य जोशी हे छोटे उद्योग आणि गृहउद्योग सुरू करण्याच्या संधी, व्यवसायाची उभारणी आणि त्यातील संभाव्य संधींविषयी मार्गदर्शन करतील. श्री निनाद खोचे हेही मार्गदर्शन करणार आहेत.
डॉ. श्रीरंग देशपांडे हे वैद्यकीय क्षेत्रातील व्यवसायाच्या संधींविषयी माहिती देतील. श्री अभिजित सराफ हे फूड प्रॉडक्ट्सची विक्री आणि व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करतील. श्री दिलीप देशमुख हे शुभेच्छापर मार्गदर्शन करतील.
परिषदेच्या समारोपप्रसंगी महामंडलेश्वर श्री महंत सुधीर दास आपले विचार मांडणार आहेत.
शेती क्षेत्रातील उद्योग, उत्पादनाची गुणवत्ता, पॅकिंग, जाहिरात, विक्री व्यवस्थापन, उद्योजकांचे एकत्रीकरण आणि सामूहिक विकास या विषयांवरही या परिषदेत भर देण्यात येणार आहे.
मोफत वधू-वर नोंदणी आणि उद्योग प्रदर्शन
या परिषदेत ब्राह्मण समाजासाठी मोफत वधू-वर नोंदणी स्टॉल उपलब्ध असणार आहे. याशिवाय उद्योग प्रदर्शनासाठी स्टॉल आणि ब्राह्मण उद्योजकांची नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे.
या माध्यमातून समाजातील उद्योजकांना आपली उत्पादने आणि व्यवसाय सादर करण्याची, नवीन व्यावसायिक संपर्क निर्माण करण्याची तसेच व्यवसायवाढीसाठी विविध संधींची माहिती मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
पत्रकार परिषदेला संयोजकांसह मान्यवरांची उपस्थिती
या ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्सच्या आयोजनासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेला संयोजक सचिन वाडे पाटील, मोरेश्वर मार्डीकर, धनंजय नारळे, योगेश धर्माधिकारी, रवींद्र पंडित, अभय जोशी, संतोष जोशी, रामेश्वर सेलुकर, दीपक कासांडे, पंढरीनाथ जोशी, संजय देशपांडे, काशीनाथ चांदजकर, उदय खांडेकर, सुजित जोशी, ऋषिकेश भालेराव, अभय पटवारी, अरविंद तेलवाडकर, शिवाजी पाथरीकर, संजय देशपांडे, विजय कुलकर्णी, यशस्विनी सेलुकर, दिलीप जोशी, दत्तात्रय किंबहुने, संतोष कुलकर्णी, महेश कुलकर्णी, उदय खोंडे, लक्ष्मीकांत राजुरकर, अनिता सामाग, जया काळे आदी उपस्थित होते.
ब्राह्मण समाजातील व्यावसायिक आणि उद्योजकांना एकत्र आणून त्यांना योग्य मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती आणि व्यवसायवृद्धीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचे संयोजक सचिन वाडे पाटील यांनी सांगितले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


67
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!