राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची राष्ट्रपती भवनात भेट; ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सोहळा
नवी दिल्ली | प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ध्वजारोहण सोहळ्याचे औपचारिक निमंत्रण देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपतींची भेट घेऊन हे निमंत्रण दिले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य तसेच विविध अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहितीही यावेळी राष्ट्रपतींना देण्यात आली.
ध्वजारोहण सोहळ्यासोबतच गोदावरी आरती, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन, कुंभमेळा गीताचे लोकार्पण, कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आणि कुंभमेळा विशेष टपाल तिकिटाचे अनावरण या कार्यक्रमांसाठीही राष्ट्रपतींना निमंत्रित करण्यात आले आहे.
यावेळी मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादाजी भुसे, नरहरी झिरवाळ, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांच्यासह विवेक सोनुणे, चंद्रशेखर पंचाक्षरी, मनोज थेटे, नरसिंहकृपा दास, डॉ. प्रवीण गेडाम आणि शेखर सिंह उपस्थित होते.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे




