जतमध्ये महासंग्राम! सांगली जिल्हा बँक निवडणुकीत पडळकर विरुद्ध पवार थेट भिडणार; ६ जागांवर धुमश्चक्री, १५ जागा बिनविरोध!


जतमध्ये महासंग्राम! सांगली जिल्हा बँक निवडणुकीत पडळकर विरुद्ध पवार थेट भिडणार; ६ जागांवर धुमश्चक्री, १५ जागा बिनविरोध!

जत/सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) रणधुमाळीत जत सोसायटी गटातील सर्वात मोठी आणि खळबळजनक अपडेट समोर आली आहे. जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या प्रचंड तडजोडीनंतरही जतचा तिढा सुटू शकलेला नाही. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर अखेर चित्र स्पष्ट झाले असून,जत सोसायटी गटात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि विनोद पवार यांच्यात थेट आणि हाय-व्होल्टेज लढत निश्चित झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदार पडळकर यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याने जतच्या या निवडणुकीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.

जतमध्ये थेट मुकाबला; काय आहे सद्यस्थिती?

• हाय-व्होल्टेज सामना: जत सोसायटी गटातून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र तडजोड न झाल्याने आता आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध विनोद पवार असा थेट सामना रंगणार आहे.

• न्यायालयीन लढाईत विजय: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारी अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात हरकत घेण्यात आली होती. मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्यानंतर न्यायालयाने पडळकर यांचा अर्ज वैध ठरवला. त्यामुळे या लढतीतील चुरस अधिकच वाढली आहे.

६ जागांवर धुमश्चक्री, १५ जागांवर ‘गुलाल’!

जिल्हा बँकेच्या एकूण २१ जागांपैकी तब्बल १५ जागांवर सर्वपक्षीय तडजोड यशस्वी ठरल्याने या जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, उर्वरित ६ जागांवर राजकीय प्रतिष्ठेची लढाई होणार आहे.

• तासगावमध्ये राजकीय वैर: तासगाव सोसायटी गटात माजी खासदार संजयकाका पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने येथे चुरशीचा सामना रंगणार आहे.

• कवठेमहांकाळमध्ये संघर्ष: या गटात माजी मंत्री अजितराव घोरपडे विरुद्ध टी. व्ही. पाटील यांच्यात थेट लढत होत आहे.

• इतर जागांवरही मतदान: जत, तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज या सोसायटी गटांसह अनुसूचित जाती आणि भटक्या विमुक्त जमाती अशा एकूण ६ जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात उरले आहेत.

वरिष्ठ पातळीवरील ‘ती’ गुप्त बैठक ठरली गेमचेंजर!

बँक पूर्णपणे बिनविरोध करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये मॅरेथॉन चर्चा झाली होती. यामध्ये मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्यात संवाद झाला,ज्यातून १५ जागांचा तिढा यशस्वीपणे सुटला,परंतु जतसह ६ जागांवर स्थानिक नेत्यांनी माघार न घेतल्याने तेथील लढत अटळ ठरली.

प्रतिनिधी : संजय कोळी.वळसंग.


67
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!