ग्रामीण विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सालवा येथे अटल इनोव्हेशन मेगा इव्हेंटचा भव्य शुभारंभ!
नागपूर जिल्ह्यातील ३२ शाळांचा सहभाग; ‘विकसित ग्रामीण भारत’ संकल्पनेवर विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण प्रतिकृतींचे प्रदर्शन
मौदा : तालुक्यातील सालवा येथील ग्रामीण विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अटल इनोव्हेशन मिशन, भारत सरकारच्या नीती आयोग, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित ‘नागपूर रिजन अटल अॅन्युअल मेगा इव्हेंट २०२६-२७’चा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता विद्यालयाच्या प्रांगणातील सभामंडपात उत्साहात संपन्न झाला.
या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन कृतिका अकॅडमी, नागपूरचे संचालक मा. विजय भामरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री साई सेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अमोलजी गारुडी होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद नागपूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. अनिल दहिफळे साहेब, अटल इनोव्हेशन मिशन नागपूर रिजनचे आरएमओ मा. अरविंद लोंढे सर, जिल्हा परिषद नागपूरचे शिक्षण उपनिरीक्षक श्री. जयेशजी वाकोडकर, संस्थेचे सदस्य श्री. गुंडेराव ठाकरे तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री. राजेश आर. मोटघरे उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व महान विभूतींच्या प्रतिमांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून प्राचार्य श्री. राजेश आर. मोटघरे यांनी या उपक्रमाचा उद्देश आणि विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळणाऱ्या व्यासपीठाचे महत्त्व विशद केले.
या मेगा इव्हेंटमध्ये नागपूर जिल्ह्यातील अटल टिंकरिंग लॅब असलेल्या तसेच बिगर अटल लॅब असलेल्या अशा एकूण ३२ शाळांनी सहभाग नोंदविला आहे. ‘विकसित ग्रामीण भारत’ या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध नाविन्यपूर्ण प्रतिकृती आणि प्रकल्पांचे प्रदर्शन या उपक्रमात करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आयोजित होणारा हा पहिलाच अटल मेगा इव्हेंट असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील नामांकित शाळांमधील इनोव्हेटर विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
याप्रसंगी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण करून सालवा परिसराला भविष्यात इनोव्हेशन हब म्हणून विकसित करण्याची मनीषा मा. विजय भामरी यांनी व्यक्त केली.
या दोन दिवसीय अटल मेगा इव्हेंटसाठी मेंटॉर म्हणून आकांक्षा वर्मा, डॉली कंगारिया आणि गितेश कुंड लाभले आहेत. विविध सत्रांच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणार आहेत.
शुक्रवारी (दि. २७ नोव्हेंबर) परीक्षकांद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतींचे मूल्यमापन करण्यात येणार असून त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे.
विद्यालयातील अटल टिंकरिंग लॅबचे प्रभारी शिक्षक श्री. लक्ष्मीकांत जे. बांते सर या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी अविरत परिश्रम घेत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मयूर एम. भोंबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. लक्ष्मीकांत जे. बांते सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पर्यवेक्षक श्री. एस. आर. पेंदाम, शिक्षक श्री. राजेश एम. ढोके, श्री. राठोड, श्री. ठाकरे, श्री. फगणे, श्री. सिल्लेवार, श्री. घोरमाडे, श्री. मोहोड, श्रीमती नारनवरे, सौ. महल्ले, कु. सुषमा ठाकरे, कु. रननवरे, कु. बावणकर, श्री. खोब्रागडे, श्री. टेकाडे सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. भांडक्कर, श्री. गाढवे, श्री. बर्वे आणि सौ. राऊत आदींनी विशेष मेहनत घेतली.
प्रतिनिधी राजेश ढोके






