सचिव मनीष घाडगेंची आत्महत्या; सहा जणांविरोधात गुन्हा
टाकळीभान प्रतिनिधी : मुकिंदपूर येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेतील अंतर्गत वादातून संस्थेचे सचिव मनीष अण्णासाहेब घाडगे (वय ४०) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पत्नी मनीषा घाडगे यांनी नेवासे पोलिस ठाणे येथे फिर्याद दिली असून सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, मनीष घाडगे हे गेल्या १५ ते २० वर्षांपासून संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत होते. संस्थापकांच्या निधनानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. संस्थेचा ताबा घेण्याच्या वादातून अध्यक्ष सुमती घाडगे, स्नेहल घाडगे, श्रुती घाडगे तसेच त्यांच्या कुटुंबीयांकडून मनीष घाडगे यांचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत होता. सचिवपदाचा राजीनामा देण्यासाठी तसेच वैयक्तिक मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी त्यांच्यावर वारंवार दबाव आणला जात असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
२६ एप्रिल रोजी संबंधितांनी मनीष घाडगे यांना कार्यालयात बोलावून सचिवपदाचे अधिकार काढून घेतल्याचे सांगितले. तसेच खोटे आरोप करून बदनामीची धमकी देत राजीनामा देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे ते तीव्र मानसिक तणावाखाली होते. पुढील दोन दिवसांतही त्यांच्यावर दबाव सुरूच असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
२८ एप्रिल रोजी दुपारी त्यांनी स्वतःवर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्यांना प्रथम नेवासे फाटा येथील रुग्णालयात, त्यानंतर अहिल्यानगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. उपचारादरम्यान १ मे रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यूपूर्वी त्यांनी मोबाईलमध्ये लिहिलेल्या चिठ्ठीत काही व्यक्तींमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा उल्लेख केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी सोपान बाजीराव काळे, अनुराधा उत्तम गोरे, सुमती साहेबराव घाडगे, स्नेहल साहेबराव घाडगे, श्रुती साहेबराव घाडगे आणि चेतन चव्हाण यांच्याविरोधात नेवासे पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
प्रतिनिधी : दिलीप लोखंडे श्रीरामपूर .










