पिंपरी-चिंचवडमध्ये बाळ चोरीच्या संशयावरून महिलेला पकडले; पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी-चिंचवड : शहरातील काळभोर नगर परिसरात बाळ चोरीच्या संशयावरून एका महिलेला नागरिकांनी पकडून पिंपरी पोलीस यांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला परिसरात संशयास्पदरीत्या वावरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने नागरिकांनी तिला अडवून चौकशी केली. यावेळी संतप्त झालेल्या काही नागरिकांनी तिला मारहाण केल्याचे सांगितले जाते.
यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित महिलेला ताब्यात घेतले. तिची झडती घेतली असता धारदार चाकू, गुंगीचे औषध आणि स्प्रे यांसारख्या संशयास्पद वस्तू आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून संबंधित महिलेची कसून चौकशी सुरू असून, ती परिसरात नेमक्या कोणत्या उद्देशाने फिरत होती याचा तपास सुरू आहे. तसेच बाळ चोरीचा कोणताही ठोस प्रयत्न झाला होता का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
प्रतिनिधी:शाम शिरसाठ पुणे










