मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढण्यासाठी थांबलात तर होणार गुन्हा दाखल
पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नवनिर्मित ‘मिसिंग लिंक’वर थांबून सेल्फी आणि फोटो काढणाऱ्या प्रवाशांवर महामार्ग पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या मार्गावर वाहनांचा वेग तासाला १०० ते १२० किमी इतका असल्याने, हौशी प्रवाशांनी वाहने थांबवणे अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहे.
मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात असून या मार्गावरील निसर्गसौंदर्य आणि पुलांची भव्यता पाहून अनेक पर्यटक गाडी थांबवून फोटो काढताना दिसत आहेत. मात्र, यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता केवळ आर्थिक दंडच नाही, तर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
सुरक्षित प्रवासासाठी महामार्गावर कोठेही वाहने उभी करू नयेत, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक शिस्त पाळण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429





