स्वामी देवेंद्र चैतन्य महाराजांना न्याय मिळवून देण्यासाठी उद्या भोकरदनमध्ये भव्य रास्ता रोको आंदोलन!
**पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; मृत्यूची SIT / CID मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी**
**भोकरदन :(प्रतिनिधी महेंद्र बेराड)** तालुक्यातील सावंगी अवघडराव येथील श्री पाताळेश्वर संस्थानचे वै. पू. स्वामी १०८ देवेंद्रजी चैतन्य स्वामीजी (दौलत बाबा) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला न्याय मिळावा, या मागणीसाठी शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भोकरदन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
स्वामी देवेंद्र चैतन्य महाराज यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच या प्रकरणातील सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत असून, पोलिसांना राजकीय व आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे तपास संथगतीने सुरू आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच स्वामीजींच्या संशयास्पद मृत्यूची विशेष तपास पथक (SIT) किंवा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (CID) चौकशी करण्यात यावी, दोषींना तात्काळ अटक करावी आणि खऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे.
याशिवाय, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने स्वतंत्र चौकशी समिती नेमून तिचा अहवाल सार्वजनिक करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
**सर्व हिंदू समाजबांधवांना एकत्र येण्याचे आवाहन**
स्वामीजींना न्याय मिळवून देण्यासाठी भोकरदन तालुक्यातील सकल हिंदू समाजातील सर्व बांधवांनी एकजुटीने उपस्थित राहावे, असे आवाहन आंदोलनाच्या पोस्टरद्वारे करण्यात आले आहे.
**स्थळ :** छत्रपती शिवाजी महाराज चौक, भोकरदन जिल्हा जालना
**दिनांक :** शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६
**वेळ :** सकाळी ११ वाजता
स्वामीजींच्या मृत्यूमागील सत्य समोर यावे आणि दोषींना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा व्हावी, यासाठी उद्या भोकरदनमध्ये जनआक्रोश व्यक्त होणार असल्याचे चित्र आहे.







