वळसंगच्या पाणीटंचाईवर उपायासाठी प्रशासकांचा पुढाकार! म्हैसाळचे पाणी गाव तलावात आणण्याची मागणी


वळसंगच्या पाणीटंचाईवर उपायासाठी प्रशासकांचा पुढाकार! म्हैसाळचे पाणी गाव तलावात आणण्याची मागणी

वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग गावातील भीषण पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रशासक श्रीशैल बिरादार यांनी पुढाकार घेतला आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी गाव तलावात सोडण्यात यावे,यासाठी प्रशासनाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांना अधिकृत निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गावातील पाण्याचे दुर्भिक्ष्य कायमचे दूर व्हावे,या उद्देशाने प्रशासक श्रीशैल बिरादार यांनी ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाफ यांना आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार २४ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार पडळकर यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.यापूर्वी १५ ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांनी याबाबत अर्ज केला होता, तर ३० ऑक्टोबर रोजी जत तहसीलदारांकडेही पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात आला होता.

विशेष म्हणजे,म्हैसाळ योजनेची मुख्य पाईपलाईन गाव तलावापासून केवळ ८०० ते ९०० मीटर अंतरावरून जाते.या टप्प्यात जोडपाईपलाईन टाकण्यासाठी आवश्यक निधी मंजूर झाल्यास,गाव तलाव पाण्याने भरून जाईल.तलावात पाणी साठल्यामुळे गावातील विहिरी आणि बोअरवेलचे नैसर्गिक पुनर्भरण होऊन भूजलपातळीत मोठी वाढ होईल आणि गावाला पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध होईल.दरवर्षी टँकरवर अवलंबून राहण्यापेक्षा वळसंगचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी ८०० ते ९०० मीटर जोडपाईपलाईनच्या प्रस्तावाला त्वरित मंजुरी देऊन निधी उपलब्ध करावा,तसेच जलसंपदा विभागाला तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत,अशी विनंती निवेदनात केली आहे.

यावेळी वकील पुजारी,ग्रामपंचायत सदस्य के. डी.पुजारी,विकास सोसायटीचे संचालक विकास लेंगरे,कैंचराव वगरे,माजी सरपंच सदाशिव अर्जुन कांबळे, टायगर ग्रुपचे अध्यक्ष धुंडाप्पा नाटेकर ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाफ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आता आमदार गोपीचंद पडळकर आणि जलसंपदा विभाग यावर काय निर्णय घेतात,याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

 

प्रतिनिधी संजय कोळी


 


86
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!