जालना मर्चंट बँक घोटाळा: मोठी कारवाई, आणखी एका आरोपीला अटक


जालना मर्चंट बँक घोटाळा: मोठी कारवाई, आणखी एका आरोपीला अटक

​जालना | ९ मे २०२६ ​जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत झालेल्या कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्यातील सक्रिय सहभागी असलेला आरोपी प्रविण पांडुरंग पुरी (वय ३२, रा. पेरजापुर, ता. भोकरदन) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

​जालना मर्चंट बँकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे वेअर हाऊसच्या नावावर १७७ बनावट खातेदार तयार करून २३ कोटी ३३ लाख रुपयांचा अपहार करण्यात आला होता. याप्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात बी.एन.एस. (BNS) आणि MPID कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे.
​घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी या प्रकरणाचा सखोल तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता.
​आतापर्यंत अटक झालेले आरोपी:
​या गुन्ह्यात आतापर्यंत मुख्य सूत्रधारांसह बँक अधिकाऱ्यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत:
​रायचंद सखाराम कुरंगळ (मुख्य सूत्रधार)
​राजेंद्र भिकचंद टोकशा (महाव्यवस्थापक, जालना मर्चंट बँक)
​नटवर सत्यनारायणजी दायमा (शाखा अधिकारी, भोकरदन शाखा)
​इतर सहकारी: निलेश्वर भोसले, रामेश्वर जाधव, ज्ञानेश्वर जाधव, सुधाकर ठोंबरे आणि गणेश साबळे.

​आर्थिक गुन्हे शाखेने पुराव्यांच्या आधारे प्रविण पांडुरंग पुरी याचा या घोटाळ्यात सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न केले. आज दिनांक ९ मे रोजी भोकरदन रोड बायपास, जालना येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. प्रविण पुरीच्या चौकशीतून आणखी काही महत्त्वाची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

​ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी उपअधीक्षक सुरेश उनवणे, सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, आणि उपनिरीक्षक शैलेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गोकुळसींग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुने आणि श्रेयस वाघमारे यांनी पार पाडली.
​”आर्थिक गुन्ह्यांवर आमची कठोर कारवाई सुरूच राईल. ठेवीदारांच्या पैशाचा अपहार करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही.”

प्रतिनिधी महेंद्र बेराड


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!