लोकमान्य हॉस्पिटलला ‘रुग्ण हक्क संघर्ष समिती’चा दणका; ३.७५ लाखांचे बिल माफ, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात


​लोकमान्य हॉस्पिटलला ‘रुग्ण हक्क संघर्ष समिती’चा दणका; ३.७५ लाखांचे बिल माफ, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

​पुणे | दि. ०९ मे २०२६
​पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटलच्या कथित चुकीच्या उपचार पद्धतीमुळे आणि बिलासाठी मृतदेह अडवून ठेवल्याप्रकरणी ‘रुग्ण हक्क संघर्ष समिती’ने आक्रमक पवित्रा घेत रुग्णालय प्रशासनाला नमविले आहे. समितीच्या मध्यस्थीनंतर रुग्णालयाने तब्बल ३,७५,००० रुपयांचे ज्यादा बिल माफ केले असून, मयत रुग्णाचा मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या स्वाधीन केला.

​कै. भारत विश्वनाथ कुलकर्णी यांना २४ एप्रिल रोजी ब्रेन ट्युमरच्या उपचारासाठी लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णास दाखल करताना प्रशासनाने साधारण ४ लाख रुपये खर्च येईल असे सांगितले होते. नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे, सुरुवातीला रीतसर ॲडव्हान्स भरून उपचार सुरू झाले. मात्र, “आजाराचे स्वरूप डोक्याचे असताना डॉक्टर पोटाचे कारण सांगत आहेत,” असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला.
​दुर्दैवाने, उपचारादरम्यान ९ मे रोजी पहाटे ३ वाजता रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने बिलाची उर्वरित रक्कम भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला, अशी तक्रार नातेवाईकांनी रुग्ण हक्क संघर्ष समितीकडे केली.

​या घटनेची माहिती मिळताच रुग्ण हक्क संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष संजयभाऊ बावळेकर यांनी सकाळी ७ वाजता कार्यकर्त्यांसह रुग्णालयात धाव घेतली. समितीचा आक्रमक पवित्रा आणि कायद्याचा बडगा पाहून रुग्णालय प्रशासन नरमले. अखेर प्रलंबित असलेले ३ लाख ७५ हजार रुपयांचे बिल पूर्णपणे माफ करण्यात आले आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
​”रुग्ण दगावल्यानंतर त्याचे बिल थकले म्हणून मृतदेह अडवून ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. रुग्णालयांनी संवेदनशीलता जपायला हवी,” असे मत संजयभाऊ बावळेकर यांनी व्यक्त केले.
​यावेळी समितीचे जिल्हा संघटक किरण बरे, उपशहर प्रमुख अमीर शेख, प्रशांत कुमावत, हेमंत गवळी, सागर उपासनी, राजेश सुलाखे, अमित मानकर, प्रमोद देशमाने, राहुल ताटे, अमर जगताप आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. न्याय मिळाल्याबद्दल कुलकर्णी कुटुंबाने समितीचे आभार मानले आहेत. या संपूर्ण प्रकरणात उदय कुलकर्णी यांनी मोलाची साथ दिली.

पत्रकार उमेश कुलकर्णी


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!