बीडमध्ये डिझेलचा भरधाव टँकर पलटी; मदत करण्याऐवजी लोकांची डिझेल चोरण्यासाठी कॅन आणि बादल्यांसह झुंबड
बीड:बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील तालखेड फाट्याजवळ आज दुपारी एक थरारक घटना घडली. डिझेलने भरलेला एक भरधाव टँकर रस्त्यावर पलटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन गळती सुरू झाली. मात्र, अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी रस्त्यावरून वाहणारे डिझेल गोळा करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अक्षरशः झुंबड उडवली.
डिझेल लुटण्यासाठी मोठी गर्दी:
टँकर पलटी होऊन डिझेल रस्त्यावर सांडू लागताच आसपासच्या नागरिकांनी हातात भांडी, कॅन आणि बादल्या घेऊन घटनास्थळी धाव घेतली. जीव धोक्यात घालून डिझेल भरण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाल्याने तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने पोलिसांनी गर्दी पांगवली आणि परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणली. डिझेल ज्वलनशील असल्याने कोणताही मोठा स्फोट किंवा आग लागण्याची शक्यता होती, मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. टँकर पलटी होण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र, अशा अपघाताच्या वेळी जीवाची पर्वा न करता इंधन गोळा करण्याच्या लोकांच्या प्रवृत्तीबद्दल आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429








