बळीराजाचा आक्रोश! कांद्याला किलोला फक्त ५० पैसे; ७३ पोती विकून शेतकऱ्याच्या हातात अवघे ४०० रुपये


बळीराजाचा आक्रोश! कांद्याला किलोला फक्त ५० पैसे; ७३ पोती विकून शेतकऱ्याच्या हातात अवघे ४०० रुपये

सोलापूर:कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील एका शेतकऱ्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. करमाळा येथील शेतकरी अंकुश गुंजाळ यांनी मोठ्या आशेने ७३ पोती कांदा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी आणला. मात्र मिळालेल्या अत्यल्प दरामुळे त्यांच्या मेहनतीची आणि खर्चाची पूर्णपणे राखरांगोळी झाली.
अंकुश गुंजाळ यांच्या कांद्याला बाजारात अवघा ५० पैसे प्रति किलो असा दर मिळाला. या विक्रीतून त्यांना एकूण ५,०६८ रुपये मिळाले. मात्र बाजार समितीपर्यंत वाहतूक, हमाली, आडत आणि इतर खर्च वजा जाता त्यांच्या हातात केवळ ४०० रुपयेच उरले. हजारो रुपयांचा उत्पादन खर्च, रात्रंदिवस केलेली मेहनत आणि नैसर्गिक संकटांचा सामना करून उभे केलेले पीक विकल्यानंतर एवढी तुटपुंजी रक्कम मिळाल्याने शेतकरी संतप्त झाला आहे.
“शेती करायची तरी कशी?” असा हतबल सवाल अंकुश गुंजाळ यांनी उपस्थित केला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. एका बाजूला बियाणे, खत, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्च सातत्याने वाढत असताना दुसऱ्या बाजूला बाजारात मिळणारा कवडीमोल दर शेतकऱ्यांना आर्थिक संकटाच्या खाईत ढकलत आहे.
कांदा उत्पादकांना योग्य हमीभाव देऊन बाजारातील दरपतनावर नियंत्रण आणावे, अशी जोरदार मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा शेती व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बळीराजाच्या घामाला न्याय मिळणार तरी कधी, असा सवाल आता सर्वसामान्यांकडूनही उपस्थित होत आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!