ओल्या कचऱ्याच्या सक्तीवर सोसायट्यांचा संताप; आयुक्तांच्या दालनात कचरा टाकण्याचा फेडरेशनचा इशारा.


ओल्या कचऱ्याच्या सक्तीवर सोसायट्यांचा संताप; आयुक्तांच्या दालनात कचरा टाकण्याचा फेडरेशनचा इशारा

 

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) ‘घनकचरा व्यवस्थापन नियम, 2026’ अंतर्गत 100 पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना स्वतःच्या परिसरात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक केल्याने सोसायटीधारकांमध्ये नाराजी पसरली आहे. चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी सांगितले की, कचरा प्रक्रिया यंत्रणा उभारण्याची जबाबदारी मूळतः बांधकाम व्यावसायिकांची (बिल्डर्स) होती. अनेक प्रकल्पांमध्ये ही सुविधा नसतानाही महानगरपालिकेने पूर्णत्व प्रमाणपत्रे कशी दिली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात प्रथम बिल्डरांवर कारवाई करून त्यांच्याकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
सोसायट्यांकडे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचे सांगत त्यांनी आर्थिक भार, दुर्गंधी, स्वच्छतेच्या समस्या तसेच तयार होणाऱ्या खताच्या विल्हेवाटीबाबत कोणतीही स्पष्ट व्यवस्था नसल्याची बाबही मांडली. कचरा व्यवस्थापनासाठी इंदूर शहराच्या धर्तीवर संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेने स्वीकारावी, अशीही मागणी फेडरेशनने केली आहे.
यावेळी सांगळे यांनी प्रशासनाला इशारा देताना म्हटले की, “जोपर्यंत या सर्व समस्यांवर समाधानकारक तोडगा निघत नाही, तोपर्यंत सोसायट्यांवर कोणतीही सक्ती करू नये. अन्यथा ओला कचरा उचलणे बंद करून तो थेट आयुक्तांच्या दालनात टाकून तीव्र आंदोलन केले जाईल.”
दरम्यान, या विषयावर झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्री. जंगम, उपायुक्त (आरोग्य) श्री. ठेंगल आणि शहर अभियंता श्री. बागवानी उपस्थित होते. त्यांनी फेडरेशनच्या मागण्या ऐकून घेतल्या असून, तज्ज्ञांच्या उपस्थितीत सविस्तर कार्यशाळा आयोजित करून यावर योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.
मुख्य मुद्दे
100 पेक्षा अधिक फ्लॅट्स असलेल्या सोसायट्यांसाठी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया बंधनकारक.
फेडरेशनचा आरोप – जबाबदारी बिल्डरांची, सोसायट्यांवर अन्यायकारक भार.
जागा, निधी, दुर्गंधी आणि खत विल्हेवाटीचे प्रश्न कायम.
इंदूर पॅटर्नप्रमाणे कचरा व्यवस्थापनाची मागणी.
मागण्या मान्य न झाल्यास आयुक्तांच्या दालनात कचरा टाकण्याचा इशारा.
प्रशासनाकडून तज्ज्ञांसह कार्यशाळा घेण्याचे आश्वासन.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!