सांगलीतील मरगुबाई देवस्थानाजवळ भिंत कोसळून ६ भाविकांचा मृत्यू; १३ जखमी.

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी गावात मरगुबाई देवस्थान मंदिराशेजारील भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मरगुबाई देवस्थान परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. यावेळी मंदिराशेजारील जुनी भिंत अचानक कोसळली. भिंत कोसळताच घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकले होते. स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी तिघे जत तालुक्यातील असून तिघे कर्नाटक राज्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी मिरज, जत, संख आणि विजापूर येथील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस आणि आरोग्य विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. प्रशासनाकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून ढिगारा हटवण्याचे काम करण्यात आले.
दरम्यान, या दुर्घटनेबद्दल विविध स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत भाविकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून जखमी भाविकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.









