रुग्णालयांसाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या १९ वाहनांच्या खर्चाची चौकशी करा
सचिन काळभोर यांची मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह इतर महापालिका रुग्णालयांमधील डॉक्टर व वैद्यकीय विभागासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या वाहनांच्या खर्चाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.
महापालिकेने विविध वैद्यकीय कामांसाठी मोठ्या संख्येने वाहने भाडेतत्त्वावर घेतली असून सध्या १९ वाहनांचा वापर सुरू असल्याचा दावा काळभोर यांनी केला आहे. या वाहनांवर महापालिकेचा मोठा आर्थिक खर्च होत असल्याने वाहनांची प्रत्यक्ष आवश्यकता, वापर, दरपत्रक, निविदा प्रक्रिया तसेच आतापर्यंत झालेला एकूण खर्च याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीने वैद्यकीय विभागांतर्गत विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी वाहने दोन वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर घेण्यास मंजुरी दिल्याची माहिती उपलब्ध आहे.
मात्र, प्रत्यक्षात या वाहनांचा वापर कोणत्या रुग्णालयासाठी, कोणत्या अधिकाऱ्यांसाठी आणि कोणत्या कामासाठी केला जात आहे, याचा तपशील सार्वजनिक करण्यात यावा. वाहनांच्या भाड्यापोटी महापालिकेच्या तिजोरीवर नेमका किती आर्थिक भार पडत आहे, याचीही माहिती नागरिकांसमोर आणावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची प्रशासकीय पातळीवर चौकशी करून अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
प्रतिनिधी विजय अडसूळ








