युद्धाच्या धोक्यापेक्षा शेती बंद होण्याचा धोका मोठा – महंत उद्धव महाराज.


युद्धाच्या धोक्यापेक्षा शेती बंद होण्याचा धोका मोठा – महंत उद्धव महाराज.

टाकळीभान प्रतिनिधी : पाचेगाव फाटा, नेवासा येथील महंत सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम, नेवासा-सुरेगाव रोड येथे आयोजित कीर्तन सेवेत शेतकऱ्यांच्या व्यथा प्रभावीपणे मांडल्याबद्दल महंत उद्धव महाराज यांचा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना महंत उद्धव महाराज म्हणाले की, “आज ६० एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना मुली दिल्या जात नाहीत, मात्र थातूरमातूर नोकरी करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे गावांची ओसाड अवस्था होत चालली आहे. शेतकरी पूर्वी राजा होता आणि आजही आहे, मात्र त्याची पत राज्यकर्त्यांनी घालवली आहे.”

ते पुढे म्हणाले की, “शेतकरी राजकारणाच्या गप्पांमध्ये कोण जिंकले, कोण हरले यावर चर्चा करतात; पण स्वतःची झालेली पडझड यावर चर्चा होत नाही. वारकरी आणि शेतकरी एकत्र आले तर मोठी शेतकरी चळवळ उभी राहू शकते. युद्धाच्या धोक्यापेक्षा शेती बंद होण्याचा धोका देशासाठी अधिक गंभीर आहे.”

कार्यक्रमात अॅड. अजित काळे यांनी सांगितले की, “महंत उद्धव महाराज यांनी आपल्या कीर्तनातून शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न मांडले आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे विदारक प्रश्न कीर्तनातून मांडणारे आपण पहिले महंत आहात. आपल्या कीर्तनाची दखल शासन दरबारीही घेण्यात आली आहे.”

शेतकरी संघटनेचे प्रवक्ते प्रा. कार्लस साठे यांनी सांगितले की, “शिक्षक आणि कीर्तनकार यांनी शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न समाजासमोर मांडल्यास समाजप्रबोधन निश्चित होईल.”

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हरीअप्पा तूवर, मेजर अशोक काळे, तालुकाध्यक्ष साहेबराव चोरमल, पंढरी महाराज आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे आभार महेश शिंदे यांनी मानले.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!