नाशिकमध्ये घटसर्प रोगाचा उद्रेक; २ चिमुकल्यांचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा हादरली
नाशिक: जिल्हयातील मालेगाव परिसरात घटसर्प (Diphtheria) आजाराने दोन लहान बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेक वर्षांपासून मालेगावात स्थायिक असलेल्या एका राजस्थानी कुटुंबातील या बालकांचा मृत्यू झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे, या बालकांचे लसीकरण झाले होते, असे सांगण्यात येत आहे. लसीकरणानंतरही अशा प्रकारे मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या घटसर्प निर्मूलनाच्या दाव्यावर आणि एकूणच आरोग्य व्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
या घटनेची माहिती मिळताच आरोग्य यंत्रणेने मालेगावात धाव घेतली असून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. घटसर्पाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सर्वेक्षण करण्याची गरज व्यक्त होत आहे. महापालिका आणि आरोग्य विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन लसीकरण मोहिमेची परिणामकारकता तपासण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी










