वसईत एटीएममध्ये तांत्रिक बिघाड; १०० रुपयांच्या बदल्यात आले ५०० रुपये, नागरिकांची उसळली गर्दी
पालघर: वसईतील गोलानी नाका परिसरात शनिवारी रात्री एका ‘हिताची’ कंपनीच्या एटीएममध्ये एक अजब प्रकार समोर आला. मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांनी मागितलेल्या रकमेपेक्षा अनेक पटीने जास्त पैसे बाहेर येऊ लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
एका ग्राहकाने १०० रुपये काढण्यासाठी कमांड दिली असता, मशीनमधून चक्क ५०० रुपयांची नोट बाहेर आली. विशेष म्हणजे, संबंधित ग्राहकाच्या खात्यातून केवळ १०० रुपयेच वजा झाले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच एटीएमबाहेर पैसे काढण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तात्काळ एटीएम बंद केले असून, या तांत्रिक बिघाडाबाबत पुढील तपास सुरू आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी










