Pimpri-Chinchwad मध्ये इंधन संकटाचे सावट; ८० टक्के पेट्रोल पंप बंद, वाहनांच्या लांबच लांब रांगा
पिंपरी चिंचवड : शहरात अचानक उद्भवलेल्या इंधन टंचाईमुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून जवळपास ८० टक्के पेट्रोल पंप बंद असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील काही मोजकेच पेट्रोल पंप सुरू असल्याने त्या ठिकाणी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक पेट्रोल पंपांनी तात्पुरती विक्री बंद केली आहे. परिणामी दुचाकी, चारचाकी तसेच व्यावसायिक वाहन चालकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा रस्त्यावरपर्यंत पोहोचल्याने वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण झाली.
इंधन मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून अनेकांनी आवश्यक कामांशिवाय वाहनांचा वापर टाळण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, प्रशासन आणि पेट्रोलियम कंपन्यांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
लवकरच इंधन पुरवठा सुरळीत न झाल्यास सार्वजनिक वाहतूक, मालवाहतूक तसेच दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी:शाम शिरसाठ पुणे










