माणुसकीचे दर्शन: डिझेलसाठी ताटकळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंप चालकाने उघडले अन्नाचे छप्पर
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव-चोपडा रस्त्यावरील एका पेट्रोल पंप चालकाने माणुसकीचे एक उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. डिझेलच्या तुटवड्यामुळे तासनतास वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी या पंप चालकाने जेवणाची व्यवस्था केली.
पश्चिम आशियातील तणावामुळे आणि पुरवठ्यातील व्यत्ययामुळे सध्या इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. जळगाव जिल्ह्यातही अनेक ठिकाणी डिझेल संपल्याने शेतकऱ्यांना पंपावर रात्रभर मुक्काम करावा लागत आहे. अशाच परिस्थितीत धरणगाव येथील पवार पेट्रोल पंपावर डिझेलच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची गर्दी झाली होती.
रात्रभर उपाशीपोटी ताटकळत बसलेल्या शेतकऱ्यांचे हाल पाहून पंप चालक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने निर्णय घेतला. त्यांनी पंपावरच मोठ्या प्रमाणावर ‘कढी-खिचडी’ तयार करून सर्व शेतकऱ्यांच्या जेवणाची सोय केली. ऐन गरजेच्या वेळी मिळालेल्या या आधारामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले
इंधनासाठी रांगेत उभे राहणे ही चिंतेची बाब असली, तरी अशा कठीण प्रसंगात एकमेकांना मदत करण्याची ही वृत्ती सर्वांची मने जिंकत आहे. सध्या या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पंप चालकाच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










