पुणे–दौंड लोकलची तातडीची गरज; प्रवाशांचा रोजचा संघर्ष वाढला
पुणे : पुणे ते यवत, केडगाव, उरळी कांचन आणि दौंड या मार्गावर दररोज कामानिमित्त प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सकाळी आणि विशेषतः संध्याकाळी पुण्यातून परतताना प्रवाशांची इतकी गर्दी होते की अनेकांना दीड ते दोन तास उभे राहून प्रवास करावा लागतो. आठ तासांची ड्युटी करून थकलेल्या प्रवाशांसाठी हा प्रवास अत्यंत त्रासदायक ठरत आहे.
या मार्गावर नियमित लोकल सेवेचा अभाव असल्याने प्रवासी एक्सप्रेस गाड्यांवर अवलंबून आहेत. मात्र अनेक वेळा जनरल डबे अपुरे पडतात आणि प्रवासी मजबुरीने आरक्षण डब्यांमध्ये चढतात. त्यामुळे आरक्षण केलेल्या प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज होणारी ढकलाढकली, उभा प्रवास आणि वेळेचा अपव्यय यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे.
यवत, केडगाव, उरळी कांचन आणि दौंड परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी पुण्यात ये-जा करतात. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रेल्वे सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. अनेक प्रवाशांनी पुणे ते दौंड दरम्यान स्वतंत्र आणि नियमित लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
प्रवाशांचे म्हणणे आहे की, “मुंबईप्रमाणे पुणे–दौंड मार्गावरही वारंवार लोकल सेवा सुरू झाल्यास हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. गर्दी कमी होईल आणि आरक्षण डब्यांतील प्रवाशांनाही त्रास होणार नाही.”
रेल्वे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पुणे–दौंड लोकल सेवा वाढवावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
— पत्रकार उमेश कुलकर्णी
मो. 9822548429





