वीज पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; भोजूनगरात शोककळा:-


वीज पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; भोजूनगरात शोककळा:-

जि. यवतमाळ, ता. उमरखेड:दि. 23 जून :-उमरखेड तालुक्यातील भोजूनगर येथे शेतात जनावरे चारत असताना एका तरुणावर वीज कोसळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. महेश गणेश आडे (वय २३) असे मृत तरुणाचे नाव असून, तो गुराखीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

फुलसावंगी परिसरात पावसाची आतुरतेने प्रतीक्षा सुरू असतानाच आज वरुणराजाने दमदार हजेरी लावली. पावसाच्या आगमनाने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या आनंदावर भोजूनगर येथील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

मिळालेल्या माहितीनुसार, भोजूनगर येथील महेश आडे हा तरुण नेहमीप्रमाणे आपली जनावरे जवळील शेतात चारण्यासाठी घेऊन गेला होता. दुपारच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसापासून बचाव करण्यासाठी महेशने जवळील झाडाचा आसरा घेतला. मात्र, त्याच वेळी झाडावर वीज कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महेशला उपचारासाठी फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

महेशच्या अकाली निधनामुळे त्याच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. त्याच्या पश्चात तीन बहिणी, एक अंध भाऊ आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. गुराखीचे काम करून तोच कुटुंबाचा आधार होता. त्यामुळे कर्त्या तरुणाच्या मृत्यूने कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे.

या दुःखद घटनेमुळे भोजूनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने संबंधित कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!