ट्रॅक्टर पलटी होऊन दोघा भाच्यांसह मामाचा दुर्देवी मृत्यू

टाकळीभान प्रतिनिधी – नेवासा तालुक्यातील सोनई येथील दत्तनगर परिसरातील दरंदले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ट्रॅक्टर अपघातात दोन अल्पवयीन सख्ख्या भावांसह त्यांच्या मामाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दत्तनगर येथील गणेश दरंदले यांची मुले अभिषेक गणेश दरंदले (वय १६) आणि विजय गणेश दरंदले (वय १४) हे शाळेला सुट्टी असल्याने खरवंडी येथे राहणारे त्यांचे मामा रामेश्वर बाळासाहेब मराठे यांच्याकडे गेले होते.
सायंकाळच्या सुमारास खरवंडीकडे जात असताना ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्याने तिघेही त्याखाली अडकले. स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र गंभीर जखमी झालेल्या तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
या हृदयद्रावक घटनेमुळे सोनई, दत्तनगर आणि खरवंडी परिसरात शोककळा पसरली आहे. दरंदले व मराठे कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला असून, गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पत्रकार: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.










