पुण्यात आमदार रोहित पवार यांचे खळ्ळखट्याक; हडपसरमध्ये फोडले दारूचे अड्डे

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून टाकणाऱ्या विषारी दारू प्रकरणात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला पोलिसांनी अटक केली असून, या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेत हडपसर परिसरातील अवैध दारू अड्ड्यांवर कार्यकर्त्यांसह धडक कारवाई केली. रोहित पवार यांनी थेट अड्ड्यावर जाऊन तोडफोड करत प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका केली. “अवैध दारू विक्रीकडे पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केल्यामुळे निरपराध नागरिकांचा जीव गेला,” असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, रोहित पवार यांनी ससून रुग्णालयाला भेट देत विषारी दारूमुळे बाधित रुग्णांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी गृह विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित करत सरकारने जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.
“राज्यात अवैध दारू विक्रीचे जाळे वाढत असताना सरकार आणि पोलिस यंत्रणा झोपेत आहेत. निष्काळजीपणामुळे १८ जणांना जीव गमवावा लागला, याला जबाबदार कोण?” असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला.
या घटनेनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली असून, अनेक ठिकाणी छापेमारी केली जात आहे. विषारी दारू प्रकरणामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.









