देवमाणूस धावला! मंदिरात हृदयविकाराचा झटका आलेल्या भाविकाचे CPR देऊन वाचवले प्राण
लातूर, औसा : लातूर जिल्ह्यातील औसा येथून माणुसकीचा आणि प्रसंगावधानाचा प्रेरणादायी अनुभव समोर आला आहे. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने तो जमिनीवर कोसळला. मात्र, उपस्थित असलेल्या एका युवकाच्या तत्परतेमुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भाविक मंदिरात दर्शन घेत असताना अचानक छातीत तीव्र वेदना होऊन बेशुद्ध पडला. हा प्रकार पाहताच परिसरात एकच गोंधळ उडाला. अनेकजण घाबरले असताना चेतन सदरे या युवकाने प्रसंगावधान राखत तातडीने मदतीसाठी धाव घेतली.
चेतनने कोणताही वेळ न दवडता संबंधित व्यक्तीला सीपीआर (Cardiopulmonary Resuscitation) देण्यास सुरुवात केली. काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर त्या व्यक्तीमध्ये हालचाल दिसू लागली आणि त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले. वेळेवर दिलेल्या सीपीआरमुळे त्याचा जीव वाचल्याचे सांगितले जात आहे.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, चेतन सदरे यांच्या धाडसाचे आणि सामाजिक जाणीवेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेकांनी त्यांना “देवदूत” आणि “देवमाणूस” अशी उपाधी देत त्यांच्या कार्याला सलाम केला आहे.
— पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










