पुणे रेल्वे स्थानकातून एक वर्षीय चिमुरडीचे अपहरण; दौंडमध्ये पोलिसांची थरारक कारवाई, तिघे जेरबंद
पुणे: पुणे रेल्वे स्थानक परिसरातील दत्त मंदिराबाहेरून एका वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या टोळीचा बंडगार्डन पोलिसांनी अवघ्या काही तासांत पर्दाफाश केला. पोलिसांनी दौंड रेल्वे स्थानकावर सापळा रचून चिमुरडीची सुखरूप सुटका केली असून, एका महिलेसह तिघांना अटक केली आहे.
३० मे रोजी पुणे रेल्वे स्टेशनजवळील दत्त मंदिराबाहेरून पालकांच्या नकळत एक वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील तसेच रेल्वे मार्गावरील तब्बल ६५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.
तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी पनवेल-नांदेड एक्सप्रेसने पळून जात असल्याचे उघड झाले. मुलीची विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपी तिला घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दौंड रेल्वे स्थानकावर सापळा रचला.
पनवेल-नांदेड एक्सप्रेस दौंड स्थानकात पोहोचताच पोलिसांनी डब्यात प्रवेश करून आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत एक महिला आणि तिचे दोन साथीदार जेरबंद झाले. अपहृत चिमुरडीची सुखरूप सुटका करून तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत असून, आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का याचाही शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे एका निष्पाप चिमुरडीचे आयुष्य वाचल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429










