शक्तीपीठ महामार्गाविरोधात विट्यात राजू शेट्टींचा आक्रोश मोर्चा; मध्यरात्रीच्या पोलिस कारवाईवर तीव्र संताप


शक्तीपीठ महामार्गाविरोधात विट्यात राजू शेट्टींचा आक्रोश मोर्चा; मध्यरात्रीच्या पोलिस कारवाईवर तीव्र संताप:-

जि. सांगली:ता.विटा:दि. 10 जून :-प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन आणि ड्रोन मोजणी प्रक्रियेविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विटा येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) व तहसीलदार कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात खानापूर तालुक्यातील बाधित शेतकरी, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नागेवाडी, माऊली आणि भाग्यनगर परिसरात प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन व ड्रोनद्वारे मोजणी करण्यासाठी पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी मध्यरात्रीपासून मोठा फौजफाटा तैनात केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कारवाईविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोजणीस विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी प्रशासनाने लोकशाही पद्धतीने संवाद साधावा, अशी मागणी केली. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या जाणार असल्याने भविष्यातील उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे.

दरम्यान, ड्रोनद्वारे मोजणी करण्याचा प्रयत्न होत असताना संतप्त शेतकऱ्यांनी त्यास विरोध केला. निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर प्रशासनाने मोजणीची प्रक्रिया तात्पुरती स्थगित केल्याची माहिती मिळाली.

प्रांत कार्यालयासमोर झालेल्या बैठकीत राजू शेट्टी यांनी प्रशासनाला शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याची मागणी केली. तसेच भूसंपादन प्रक्रियेमुळे प्रभावित होणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज व इतर शासकीय सुविधांपासून वंचित ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी ॲड. दीपक लाड, संजय बेले, संदीप राजोबा, विश्वास कोळी, प्रांताधिकारी विक्रमसिंह बादल, तहसीलदार योगेश टोणपे यांच्यासह खानापूर व विटा परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र असून, पुढील काळात या प्रश्नावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!