पुण्यात मानाचा तुरा: टी. जे. महाविद्यालयाची ‘विकसित भारत @ 2047’ साठी निवड
पुणे, ११ जून २०२६ — केंद्र सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या उपक्रमात खडकी येथील टिकाराम जगन्नाथ (टी. जे.) महाविद्यालयाची निवड झाली आहे. “विकसित भारत @ २०४७” या राष्ट्रीय मोहिमेबाबत देशभरातील निवडक १५० महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार असून, पुण्यातून निवडलेले टी. जे. हे एकमेव महाविद्यालय आहे. या यशामुळे पुण्याच्या शैक्षणिक दालनाला मानाचा तुरा उभारला गेला आहे.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्दिष्ट भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या मार्गावर देशातील तरुणांना सहभागी करणे आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पना, मतं आणि नेतृत्वगुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत थेट सहभाग देणे हाच या मोहिमेचा प्रमुख हेतू आहे.
युवा व क्रीडा मंत्रालयाने पारंपरिक राष्ट्रीय युवा महोत्सवाचे स्वरूप बदलून ते “विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग” आणि “विकसित भारत युथ पार्लमेंट” असे नवीन रुप दिले आहे. या उपक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
महाराष्ट्रातून एकूण पाच महाविद्यालयांची निवड झाली आहे. ती पुढीलप्रमाणे:
एसएससीटी कला व वाणिज्य महाविद्यालय, ठाणे
के. जी. जोशी महाविद्यालय, ठाणे
टिकाराम जगन्नाथ (टी. जे.) महाविद्यालय, पुणे
ठाकूर रामनारायण महाविद्यालय, मुंबई
सी. के. ठाकूर महाविद्यालय, पनवेल
खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सचिव आनंद छाजेड आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. आयोजितीचे नियोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या NSS विभागाचे संचालक डॉ. गणेश भामे, राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक अजय शिंदे, कार्यक्रम अधिकारी डॉ. अविनाश कोल्हे आणि प्राध्यापक प्रा. अर्चना तारू व प्रा. जितेंद्र मडके यांनी केले आहे. या उपक्रमात पुणे व परिसरातील सुमारे २५० महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे.
कृष्णकुमार गोयल यांनी या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले: “पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘विकसित भारत @ २०४७’ या उपक्रमासाठी आमच्या महाविद्यालयाची निवड होणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. पुण्यातील हे एकमेव महाविद्यालय असून, हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429







