देवस्थाने व मंदिरे हा आपल्या संस्कृतीचा पाया – ह.भ.प. गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज.


देवस्थाने व मंदिरे हा आपल्या संस्कृतीचा पाया – ह.भ.प. गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज

टाकळीभान प्रतिनिधी : देवस्थाने आणि धार्मिक स्थळे ही भारतीय संस्कृतीची ओळख असून समाजातील अध्यात्म, संस्कार आणि एकात्मतेचे केंद्र आहेत. टाकळीभान येथील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व नव्याने उभारल्या जात असलेल्या श्री संत तुकाराम महाराज मंदिराच्या माध्यमातून ग्रामस्थांनी संस्कृतीचा पाया अधिक भक्कम करण्याचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज यांनी केले.

टाकळीभान येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वरील बाजूस नव्याने बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे उद्घाटन महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर त्यांनी नव्याने उभारल्या जात असलेल्या श्री संत तुकाराम महाराज मंदिराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना त्यांनी सामाजिक एकात्मता आणि मानवतेचा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राहुल पटारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी मंदिर बांधकामासाठी लोकवर्गणीतून मिळालेली मदत, लोकप्रतिनिधींचे सहकार्य तसेच मंदिराच्या पुढील विकास आराखड्याची माहिती दिली.

मार्गदर्शन करताना महंत भास्करगिरीजी महाराज म्हणाले की, सर्व जाती-धर्मांचा आदर व सन्मान करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक धर्माची शिकवण प्रेम, बंधुभाव आणि एकात्मतेचीच असून त्यातून समाज अधिक मजबूत होतो. मंदिरांच्या उभारणीबरोबरच समाजातील वंचित, अडचणीत आलेल्या किंवा चुकीच्या मार्गावर गेलेल्या व्यक्तींचा ‘जीर्णोद्धार’ करणेही तितकेच आवश्यक आहे. अशा व्यक्तींना धीर, आधार आणि योग्य दिशा देऊन मुख्य प्रवाहात आणणे हे समाजाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

याच प्रसंगी ह.भ.प. ऋषिकेश महाराज वाघुले यांच्या आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे उद्घाटन राम मंदिर येथे महाराजांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी सभापती नानासाहेब पवार, सोसायटीचे चेअरमन मंजाबापू थोरात, श्रीकांत भालेराव, प्रा. जयकर मगर, आबासाहेब ढूस, रोहिदास पटारे, खंडेराव गवांदे, ह.भ.प. बाळासाहेब महाराज कानडे, ह.भ.प. दत्तात्रय बहिरट महाराज, ह.भ.प. लक्ष्मण नांगरे महाराज, ह.भ.प. संतोष पटारे महाराज, ह.भ.प. राधेश्याम महाराज पांडागळे, ह.भ.प. सुदाम महाराज चौधरी, ह.भ.प. सुदाम महाराज होन, ह.भ.प. रविंद्र महाराज गांगुर्डे, ह.भ.प. शुभम महाराज बनकर, डॉ. सोनल भालेराव यांच्यासह श्री संत तुकाराम महाराज मंदिर विश्वस्त मंडळ, सद्गुरु किसनगिरी बाबा भक्त मंडळ, महिला-पुरुष भजनी मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!