मानवतरोड रेल्वे स्थानकावर भीषण अपघात; एक्सप्रेसच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू:-
परभणी:दि. 14 जून :-परभणी जिल्ह्यातील मानवथ रोड रेल्वे स्टेशन येथे शनिवारी सकाळी घडलेल्या भीषण रेल्वे अपघातात एका 42 वर्षीय प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून झरी गावावर शोककळा पसरली आहे.
शनिवार, 13 जून रोजी सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास धर्माबादहून मनमाडकडे जाणारी हायकोर्ट एक्सप्रेस स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर येत असताना एकनाथ सत्वधर हे अचानक रेल्वेच्या खाली आले. या भीषण अपघातात त्यांचे दोन्ही पाय गंभीर जखमी झाले.
घटना घडताच स्थानकावरील प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी अवस्थेत त्यांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव आणि गंभीर दुखापतींमुळे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या निधनामुळे झरी गावासह पाथरी तालुक्यात शोक व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास रेल्वे पोलिसांकडे सोपविण्यात आला असून, हा अपघात रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात झाला की अन्य काही कारण होते, याचा तपास सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.
पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.









