कर्जतमध्ये मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याकडून महिलेचा विनयभंग; ग्रामस्थांच्या ठिय्यानंतर गुन्हा दाखल


कर्जतमध्ये मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याकडून महिलेचा विनयभंग; ग्रामस्थांच्या ठिय्यानंतर गुन्हा दाखल

कर्जत : कर्जत जकात नाक्याजवळील रेल्वे पुलावर एका महिलेचा पाठलाग करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलीस कर्मचारी प्रमोद मारोती पाटील आणि त्याचा साथीदार महेंद्र भगवान भंडारे यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कर्जत जकात नाक्याजवळील रेल्वे पुलावरून जात असताना आरोपींनी तिचा पाठलाग केला. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रमोद पाटील याने महिलेला उद्देशून आक्षेपार्ह स्वरूपाचे शब्द वापरत तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.
आरोपींपैकी एकजण पोलीस कर्मचारी असल्याने सुरुवातीला तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात एकत्र येत ठिय्या आंदोलन केले.
ग्रामस्थांच्या आक्रोशानंतर पोलिसांनी प्रमोद मारोती पाटील आणि महेंद्र भगवान भंडारे यांच्याविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. या घटनेचा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, घटनेचा व्हिडिओ तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील तपास केला जात आहे. पोलीस कर्मचारीच या प्रकरणातील आरोपी असल्याने तपास निष्पक्षपणे होणार का, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


52
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!