गणेशोत्सवात रेल्वे प्रवाशांना मोठा फटका; पुण्यात १५ दिवसांचा मेगा ब्लॉक


गणेशोत्सवात रेल्वे प्रवाशांना मोठा फटका; पुण्यात १५ दिवसांचा मेगा ब्लॉक

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात पुणे रेल्वे विभागातील प्रवाशांसाठी मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. हडपसर ते घोरपडीदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत १५ दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
या ब्लॉकदरम्यान पुणे आणि हडपसर यार्डमध्ये अभियांत्रिकी, सिग्नलिंग, टेलिकम्युनिकेशन तसेच ओव्हरहेड उपकरणांशी संबंधित कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांसह पुणे परिसरातील उपनगरीय आणि DEMU सेवांवरही परिणाम होणार आहे.
४२ गाड्या रद्द
या कालावधीत विविध तारखांना एकूण ४२ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे-सोलापूर, पुणे-नागपूर, पुणे-मुंबई यांसह विविध मार्गांवरील गाड्यांचा समावेश आहे.
२५ गाड्यांचे मार्ग बदलले
याशिवाय २५ रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही गाड्या पर्यायी मार्गाने धावणार असून काही गाड्यांचे प्रवासाचे प्रारंभिक किंवा अंतिम स्थानक बदलण्यात आले आहे. काही सेवांच्या वेळांमध्येही बदल करण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक पुणे आणि मुंबईसह विविध शहरांतून आपल्या गावी प्रवास करतात. त्यामुळे या मेगा ब्लॉकचा प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीचे वेळापत्रक, रद्द होण्याची स्थिती किंवा मार्गातील बदल तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


52
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!