दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सहा वर्षांनंतर FIR; CBI कडून तपासाला सुरुवात
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची माजी मॅनेजर दिशा सालियन यांच्या २०२० मधील मृत्यू प्रकरणाला तब्बल सहा वर्षांनंतर नवे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणात FIR नोंदवून तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत.
दिशा सालियन यांचा ८ जून २०२० रोजी मुंबईतील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. या घटनेची सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत सखोल तपास आणि FIR नोंदवण्याची मागणी केली होती.
या प्रकरणावर सुनावणी करताना बॉम्बे हायकोर्टाने सहा वर्षांपासून सुरू असलेली चौकशी अपुरी असल्याचे नमूद करत, प्रकरणात संज्ञेय गुन्ह्याचा तपास आवश्यक असल्याचे म्हटले. त्यानंतर CBI कडे तपास सोपवण्याचे निर्देश देण्यात आले. न्यायालयाने CBI च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिशाच्या वडिलांचा जबाब नोंदवून FIR दाखल करण्याचे आदेश दिले होते.
दिशाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीत हत्या, सामूहिक बलात्कार आणि पुरावे नष्ट केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र, हे आरोप सध्या तपासाच्या कक्षेत असून त्यांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. उच्च न्यायालयानेही कोणत्याही व्यक्तीला तपासातून पुरेसे पुरावे मिळेपर्यंत आरोपी मानू नये, असे स्पष्ट केले आहे.
CBI ने मुंबई पोलिसांकडून या प्रकरणातील कागदपत्रे व संबंधित पुरावे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे दिशा सालियन यांच्या मृत्यूमागील नेमके कारण, त्या रात्री घडलेल्या घटनाक्रमाची सत्यता आणि यापूर्वीच्या तपासातील विसंगती यांचा नव्याने तपास होण्याची शक्यता आहे.
आता CBI च्या तपासातून या प्रकरणातील आरोपांना पुराव्याचे बळ मिळते का, की वेगळे तथ्य समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी






