धाराशिवमध्ये भव्य ‘अमृत बाजार पेठ’चे उत्साहात उद्घाटन; स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगाराला मिळणार गती
धाराशिव:स्थानिक नागरिकांना सर्व जीवनावश्यक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या भव्य **’अमृत बाजार पेठ’**चे उद्घाटन १३ सप्टेंबर रोजी आचार्य गल्ली येथील राम मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडले.
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) आणि ‘ज्ञानदा सुशिक्षित बेरोजगार बहुउद्देशीय सामाजिक संस्था, धाराशिव’ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अमृत प्रबोधिनीचे विभागीय उपव्यवस्थापक श्री. ओंकार शेटे उपस्थित होते. त्यांनी दीपप्रज्वलन व फित कापून या बाजार पेठेचे औपचारिक उद्घाटन केले.
यावेळी बोलताना श्री. शेटे म्हणाले, “अमृत बाजार पेठ हा केवळ व्यावसायिक प्रकल्प नसून स्थानिक उत्पादक आणि ग्राहकांना जोडणारा भक्कम दुवा आहे. समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी अमृत प्रबोधिनी सदैव प्रयत्नशील असून धाराशिवमध्ये अशा आधुनिक बाजार पेठेमुळे स्थानिक उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराला मोठी गती मिळेल.”
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान सामाजिक कार्यकर्त्या सौ. सगुणाताई आचार्य यांनी भूषवले. प्रसंगी ज्ञानदा संस्थेचे अध्यक्ष गोपाल आचार्य, अमृत धाराशिवचे उपव्यवस्थापक अजय कुलकर्णी यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, प्रतिष्ठित व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





