अमेरिका-इराण संघर्ष संपण्याच्या मार्गावर; शांतता कराराची घोषणा
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण संघर्षाला पूर्णविराम मिळण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले असून, दोन्ही देशांमध्ये शांतता कराराबाबत सहमती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी याबाबत माहिती दिली.
या करारामुळे मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्यास मदत होईल, तसेच जागतिक स्तरावरील सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्यालाही सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणारी तेल वाहतूक पूर्ववत सुरू होण्याची शक्यता असल्याने जागतिक ऊर्जा बाजाराला मोठा दिलासा मिळू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, या करारावर १९ जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये औपचारिक स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. इराणचे उपपरराष्ट्रमंत्री काझम गरीबाबादी यांनीही शांतता प्रक्रियेबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या भागाकडे लागले होते. विविध देशांनी मध्यस्थीचे प्रयत्न केले होते. अखेर दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतर शांतता कराराचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, कराराचे संपूर्ण तपशील अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाहीत. तसेच प्रस्तावित करारावर औपचारिक स्वाक्षरी होणे बाकी असल्याने पुढील घडामोडींवर जगाचे लक्ष लागले आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी ९८२२५४८४२९










