जयपूरमध्ये CJP संस्थापक अभिजीत दीपके यांना थप्पड; आंदोलनस्थळी गोंधळ, दोन जणांना मारहाण

जयपूर प्रतिनिधी : नीट पेपरफुटी, शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि तरुणांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करण्यासाठी जयपूर येथे आलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासोबत आंदोलनादरम्यान धक्कादायक घटना घडली. दोन तरुणांनी अभिजीत दीपके यांच्या कानशिलात लगावल्याने आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलक जयपूरच्या शहीद स्मारकावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करत होते. यावेळी घोषणाबाजीवरून काही तरुणांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि दोन तरुणांनी अभिजीत दीपके यांच्यावर हात उगारल्याचे सांगितले जाते.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या CJP समर्थकांनी संबंधित दोन्ही तरुणांना पकडून बेदम मारहाण केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत एका तरुणाला ताब्यात घेतले.
दरम्यान, आंदोलनस्थळी गर्दीचा फायदा घेत अनेक आंदोलकांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्यामुळे व्यासपीठावरून उपस्थितांना आपले मोबाईल फोन आणि वैयक्तिक सामान सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
या संपूर्ण घटनेमुळे शिक्षणविषयक प्रश्नांवर सुरू असलेल्या आंदोलनाला वेगळेच वळण लागले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.










