जि.प. शाळा बोरसूत येथे उत्साहात प्रवेशोत्सव; नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

संगमेश्वर (रत्नागिरी) : तालुक्यातील बोरसूत गावातील जि.प. प्राथमिक शाळा बोरसूत येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, गुलाबपुष्प देऊन तसेच औक्षण करून स्वागत करण्यात आले.
शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे कोऱ्या पांढऱ्या कागदावर घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची ही स्मरणीय सुरुवात भविष्यात त्यांना प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाला गावाचे सरपंच चेतन खामकर, शर्वरी खामकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नयन गमरे, उपाध्यक्षा स्वप्नाली शिंदे, मुख्याध्यापिका नेत्रा पवार, शिक्षक रुपेश किरवे, पोलीस पाटील रविंद्र कांबळे, माजी विद्यार्थी सचिन माने, नंदू खामकर, भालचंद्र माने, भाग्यश्री माने, पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश तसेच खाऊ, बिस्कीट आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत आणि शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण तयार व्हावे, या उद्देशाने प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद देत नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी: भालचंद्र माने.









