जळगावातील वर्ड स्कूलमध्ये १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
जळगाव, दि. २१ जून २०२६ :
१२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जळगाव येथील वर्ड स्कूलमध्ये योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा काटकर, शिक्षकवृंद, विद्यार्थी व विद्यार्थी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी ८ वाजता शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांना एकत्रित करून योग कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योग शिक्षण विभागाच्या विद्यार्थिनी सौ. मनीषा चौधरी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. योग साधनेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते, तणाव कमी होतो आणि जीवनशैली अधिक निरोगी बनते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. नियमित योगाभ्यासाचे फायदेही त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
यानंतर विद्यार्थ्यांचा शारीरिक व्यायाम घेण्यात आला तसेच त्यांना विविध योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवून प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्साहाने योगासने केली. यावेळी शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत योगासनांचा सराव करून कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प अनेक विद्यार्थ्यांनी केला. कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या वतीने यशस्वीरीत्या करण्यात आले.
पत्रकार सुमेश मुळे









